एटलस सायकलीवर योग यात्रा भाग १: प्रस्तावना

 

नमस्कार!

नुकतीच मी एक सायकल मोहीम पूर्ण केली. योग प्रसारासाठी सायकल यात्रा अशा मोहीमेत सुमारे ५९५ किलोमीटर सायकल चालवली आणि ठरवल्याप्रमाणेच ही मोहीम पूर्ण झाली (फक्त काही कारणामुळे एक टप्पा कमी झाला). मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात कार्यरत ‘निरामय योग प्रसार व संशोधन संस्था’ तसेच तिच्या कामाचा झालेला विस्तार ह्या संदर्भात हा प्रवास होता. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग साधक, योग शिक्षक ह्यांच्याशी ह्या प्रवासात भेटलो. आता त्याविषयी सविस्तर लिहिणार आहे.

पहली गोष्ट म्हणजे कोणत्याही विषयाचा प्रसार करायचा असेल, तर अनेक मुद्दे येतात. प्रत्यक्ष केलेला प्रसार नेहमीच प्रभावी ठरेल, असं नाही. अनेक लोक अनेक वेळेस आग्रह केल्यानंतर एखादी गोष्ट करतात. पण हे सगळ्यांनाच लागू पडत नाही. माझं स्वत:चं उदाहरण हेच की, मला एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह केला तर मी त्या विषयापासून शक्यतो लांबच गेलो आहे. त्यामुळे योग प्रसार ही इतकी सरळ बाब नाही. प्रत्यक्ष प्रसाराच्या ऐवजी अप्रत्यक्ष प्रसारावर माझा जास्त विश्वास आहे. कोणाला योग करा, असं सांगण्याऐवजी तो स्वत: करण्यावर जास्त विश्वास आहे. आणि ह्या प्रवासात ते बघायलाही मिळालं. ही एक सायकल मोहीम होती आणि सायकल वापरा हा संदेश व सायकल प्रसार हा मुद्दासुद्धा त्यातील एक अंतर्गत भाग होताच. मी कोणालाच म्हंटलं नाही की, सायकल चालवा. पण प्रत्येक ठिकाणी काही लोक स्वत:हून सायकल चालवताना दिसले. त्याशिवाय प्रत्येक ठिकाणी योग- साधकांसोबत खूप छान भेटी झाल्या. योगाचा एक अर्थ जोडणे असा आहे आणि ह्या पूर्ण प्रवासात अनेक लोकांसोबत मी जोडला गेलो. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांच्या टीममध्येही नवीन लोक कुठे कुठे जोडले गेले. ही सायकल यात्रा त्यांच्या जोडलं जाण्यासाठी एक माध्यम बनली. अप्रत्यक्ष व अपरोक्ष प्रकारे योगाला चालना मिळाली. एक सायकलवर आलेल्या प्रवाशाला भेटून काम करणा-या कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला. ह्याचं श्रेय सायकलला जातं, त्यामध्ये असलेल्या इनोव्हेशनला जातं.

प्रसाराबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे एकाने मला असंही विचारलं की, जर योग प्रसार करायचा आहे, तर त्यासाठी सायकल कशाला चालवतो, सरळ योग प्रसारह का करत नाही? अगदी बरोबर आहे हेसुद्धा. एका अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. अनेक लोकांचा असा विचार असू शकतो व त्यांच्या ठिकाणी ते बरोबरही आहे. पण मला वाटतं की, कोणताही विषय समोर घेऊन जाण्याचे अनेक मार्ग असतात आणि असले पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीने विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून व साधनातून हा विषय लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि प्रत्येकाची आवड असते. दुसरी गोष्ट अशी पण आहे की, सायकलिंग हे मी योगाला समांतर आहे, असं अनुभवलं आहे. त्याविषयी विस्ताराने बोलेनच. असो.

… ११ मे ला परभणीतून प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक दिवस निरामयच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा होत राहिली. हळु हळु रूट ठरला. सगळ्यांशी संपर्क झाला. एखाद्या संस्थेसोबत आणि एखादा विषय घेऊन सायकलिंग करण्याचा माझ्यासाठी हा पहिलाच प्रयोग असेल. माझी ही पहिली सायकल मोहीम असेल ज्यामध्ये मी फक्त सायकलिंगच नाही तर त्यासोबत इतरही काही‌ करण्याचा प्रयत्न करेन. सोलो सायकलिंग असलं तरी प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत अनेक लोक असतील. त्यासाठी सर्व प्रकारे तयारी केली. माझे मागच्या योग ध्यान- सायकल यात्रेच्या वेळचे टी- शर्टस व सायकल बॅनर ह्यावेळीही उपयोगी पडतील. संस्थेद्वारेही काही तयारी करण्यात आली. आणि प्रत्यक्ष सायकलिंगचा भाग म्हणून जुन्या एटलस सायकलवर काही प्रॅक्टीस राईडस केल्या. तेव्हा जाणवलं की, ह्या सायकलीवर आरामात ४ तासांमध्ये ५५- ६० किलोमीटर जाता येऊ शकेल. रोज सकाळी साडेपाचला सुरू करून जास्तीत जास्त साडेदहा- अकरा वाजेपर्यंत चार- पाच तास सायकल चालवेन. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि माझ्या प्रवासात मला बरेचसे वाईट रस्तेही लागतील. त्यामुळे सायकलची नीट सर्विसिंग करून घेतली व नवीन टायर आणि ट्युब्ज टाकले. पंक्चर होणार नाहीत, असे जाड टायर टाकले. पण जाण्यापूर्वी एक दिवस जेव्हा छोटी राईड केली, तेव्हा सायकल जड झाली आहे, असं जाणवलं. नवीन टायर्समुळे काही दिवस असं वाटेल व नंतर टायर्स एडजस्ट होतील, अशी स्वत:ची समजुत काढली.

१० मे च्या रात्री अजिबात झोप आली नाही. मी आजवर जितकं सायकलिंग केलं आहे, ते बघता माझ्यासाठी ही कठीण किंवा आव्हानात्मक मोहीम नाही आहे. पण तरीही एक प्रकारचं नावीन्य आहे. सकाळी लवकर उठून जायचं आहे. कदाचित ह्या कारणामुळे झोप लागलीच नाही. मी पूर्वी जेव्हा अर्ध मॅरेथॉन धावलो होतो, तेव्हाही असंच झालं होतं. सकाळचा प्रसंग इतका मोठा आहे, की त्यामुळे मन फार सजग होऊन जात असावं- कॉन्शस होत असावं. आणि जेव्हा इतकी सजगता असेल, तेव्हा झोप येतह् नाही. कारण झोपेसाठी सजगता कमी असली पाहिजे. सजगता किंवा जागरूकता हीसुद्धा एक प्रकारची ऊर्जा आहे. जेव्हा एखाद्या कारणामुळे- एखाद्या प्रसंगामुळे किंवा एखाद्या दु:खद घटनेमुळे आपण खूप सजग होतो, तेव्हा झोप लागतच नाही. सजगता हीसुद्धा एक ऊर्जा आहे आणि जर ही ऊर्जा फार जास्त झाली तर झोप येत नाही. तसेच ही उर्जा फार कमी झाली, तरीही झोप येत नाही जसं खूप जास्त थकल्यावरसुद्धा झोप लागत नाही. हे असं बघता येईल की, आपल्याकडे काही विशिष्ट पातळीपर्यंतच सजगता ठेवण्याची क्षमता असते. काही जणांना स्टेजवर जाऊन भाषण करता येत नाही. कारण स्टेजवर गेल्यावर खूप लोकांचे डोळे आपल्याला बघतात; सजगता एकदम वाढते. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे लहान मुलाकडे लक्ष देणं हे त्याचं एक प्रकारचं पोषण असतं. सायकल चालवतानाही अनेकदा बघितलं आहे की, खूप थकतो तेव्हा समोरून येणा-या जाणा-यांकडे नजर देणंही कठीण होतं.  असं बघण्यातही ऊर्जा जाते. एकदा तोरणमाळला सायकलवर जात असताना थकल्यामुळे सजगता इतकी कमी झाली होती की, येणारं तोरणमाळ आहे की दुसरं हिल स्टेशन ही जाणीवही उरली नव्हती. असो. पण ह्या कारणामुळे झोप लागली नाही. जणू समोर खूप मोठा दिवा ठेवल्यानंतर अंधार होणारच नाही.

११ मे ची पहाट. अगदी थोडी झोप झाली आहे. तरीही लवकर तयार झालो. आधी अनेक सायकल मोहीमा केल्या असल्यामुळे सामान बांधणं, कमीत कमी सामान घेणं, आहार काय घ्यावा, ह्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. पहाटे सव्वा पाचला निरामय संस्थेमध्ये पोहचलो. अंधारातच काही जण मला निरोप द्यायला आले आहेत. त्यांच्या शुभेच्छांमुळे उत्साह वाढला. उजाडत असताना सायकल सुरू केली. एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली! ही योग- यात्रा व सायकल यात्रा तर असेलच, पण बाह्य नाही तर एक अंतर- यात्रासुद्धा असेल. पहिल्या दिवसाची चर्चा पुढच्या लेखात करू.

आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही ‘योग दान’ द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढील भाग: परभणी- जिंतूर- नेमगिरी (५५ किमी)

फोटो बघण्यासाठी इथे क्लिक करा: www.niranjan-vichar.blogspot.in

 

 

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी-जिंतूर- नेमगिरी

 

 

११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे. आजचा टप्पा तसा घरापासून अंगणातलाच आहे. पूर्वी अनेकदा जिंतूर- नेमगिरीकडे आलो आहे.सायकलीवर माझं पहिलं शतक ह्याच रूटवर झालं होतं.त्यामुळे एका अर्थाने आजचा टप्पा साधारणच वाटतो आहे. जिंतूर घरापासून ४५ किमी आहे व तिथे सामान ठेवून जवळच्याच ३ किमीवर असलेल्या नेमगिरी डोंगरावर जाईन.

३ लीटर पाणी सोबत घेऊन जातोय. त्यात इलेक्ट्रॉल टाकलेलं आहे. शिवाय सोबत चिक्की- बिस्कीट ठेवलं आहे व मध्ये मध्ये ते खातोय. अर्धा तास झाल्यानंतर शरीर लयीत आलं आणि आरामात पुढे जाऊ शकतोय.अजून कोवळं ऊन आहे. ह्या वेळी विचार करतोय की कमीत कमी ब्रेक घ्यावेत. रस्त्यावर हॉटेलमध्ये फार पर्याय नसल्यामुळे चहा- बिस्कीटावर भर देईन. खूप वेळेपर्यंत पहिला ब्रेक घ्यावासा वाटला नाही. ३० किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर बोरी गावात पहिला ब्रेक घेतला. चहा- बिस्कीट घेतलं व तिथे असलेल्या लोकांना माझ्या प्रवासाविषयी सांगितलं आणि संस्थेची पत्रकंसुद्धा दिली. आता फक्त पंधरा किलोमीटर बाकी‌आहेत. पण आता ऊन वाढतंय व माझ्या शरीरात डिहायड्रेशनची लक्षणं दिसत आहेत. कदाचित पहिला ब्रेक घ्यायला उशीर केला, त्यामुळे ऊर्जा स्तर थोडा कमी असावा. पण पुढे जात राहिलो. जिंतूरच्या सहा किलोमीटर आधी चांदज गावात रस्त्यावर असलेल्या काही जणांनी माझा फोटो घेतला. मग कळालं की, ते पाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत व इकडच्या गावांमध्ये जल संवर्धनाचं काम करत आहेत. पाणी फाउंडेशनचं काम अनेक गावांमध्ये चांगलं सुरू आहे. त्यांनी माझ्या प्रवासाला व मी त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या. काही पत्रकंही दिली. आता जिंतूर फक्त सहा किलोमीटर.

समोर दिसत असलेल्या टेकड्या बघत जिंतूरला पोहचलो. जिंतूरचे योग- शिक्षक व योग स्वाधक स्वागतासाठी तयार आहेत. काही सायकलिस्टपण आहेत. पण आता पोहचल्यावर मला खूप थकायला झालं आहे. कसबसं त्यांचं स्वागत स्वीकारलं, थोडं बोललो व जिथे आज थांबायचं आहे, तिथे सामान ठेवून नेमगिरीसाठी निघालो. नेमगिरी प्राचीन जैन तीर्थ स्थान आहे. ३ किलोमीटर अंतरावरच आहे. एक योग कार्यकर्ते- मते सर सायकलवर सोबतीला आले. आधीही अनेकदा इथे आलो आहे. इथे एक छोटा एक किलोमीटरचा घाट लागतो. तिथे सायकल चढण्याची अपेक्षा नव्हतीच आणि पायी पायी गेलो. पहिल्यांदा जेव्हा गेअरच्या सायकलीवर आलो होतो, तेव्हाही इथे पायी जावं लागलं होतं. पण पुढे सराव वाढल्यानंतर दुस-या गेअरच्या सायकलीवर आरामात घाट पार केला होता.पण ही एटलस सिंगल गेअरची सायकल असल्यामुळे चढणार नाही. त्यामुळे एक किलोमीटर चालत गेलो व पाय थोडे मोकळे झाले.

पण आता फार थकवा वाटतोय. आणि खरं सांगायचं तर ऊष्माघाताची भिती वाटतेय. कसबसं नेमगिरीच्या विशाल मूर्त्यांचं दर्शन घेतलं. येताना थोडा उतार होता आणि नंतर कशीतरी सायकल चालवत मुक्कामाच्या जागी पोहचलो. परभणीतून निरोप देताना काही जण मला एनर्जाल देत होते. पण सामान जास्त आहे, सांगून घेतलं नाही! पण आता मला एनर्जालचाच आधार आहे.योग शिक्षकांनी मला एनर्जाल व इलेक्ट्रॉल आणून दिलं.हळु हळु आराम करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण स्थिती अशी बिकट होती की, आरामही नीट करता येत नाहीय.डिहायड्रेशनची सगळी लक्षणं दिसत आहेत. तेव्हा खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉलयुक्त पाणी पिण्यास सुरुवात केली व कसबसं तीन- चार तासांनंतर थोडं बरं वाटलं.रात्रभर नीट झोप न झाल्यामुळे दुपारी एक तासांची झोप मला अनिवार्य आहे. पण तीसुद्धा मिळाली नाही. त्यामुळे सुमारे दीड तास डोळे बंद करून पडलो. नंतर लॅपटॉपवर माझं ऑफीसचं कामही केलं. दुपारी नळाच्या पाण्याने हात पोळत आहेत. एकदा तर वाटलं माझी ही योजना खरंच जमेल ना? कारण इतकं कठीण असेल तर… पण लवकरच आत्मविश्वास आला, कारण कोणत्याही सायकल प्रवासात पहिला दिवसच सर्वांत कठीण असतो. शरीराला लयीमध्ये यायला वेळ लागतो. शिवाय सायकलीचे टायर्स बदलले आहेत, त्यामुळे ते थोडे जड आहेत. दोन- तीन दिवसांमध्ये तेही थोडे एडजस्ट होतील व सायकल चालवणं थोडं सोपं होईल. संध्याकाळ होईपर्यंत डिहायड्रेशनची लक्षणं थोडी कमी झाली. संपूर्ण दिवसभरात पारवे सर व इतर योग- आधकांनी खूप सहकार्य केलं. त्यामुळे थोडं तरी रिलॅक्स होऊ शकलो.

संध्याकाळी अशाच थकलेल्या व अपुरी झोप झालेल्या स्थितीत जिंतूरच्या योग- प्रेमींसोबत चर्चा केली.अनौपचारिक योग- गप्पा असं स्वरूप. ही चर्चा जिंतूरच्या बोर्डीकर महाविद्यालयाच्या परिसरात झाली. पंचवीस-तीस योग साधक आले. निरामय संस्थेचे पाच योग शिक्षक आहेतच, शिवाय इतरही काही ग्रूप्स होते.पतंजली व आर्ट ऑफ लिव्हिंगशी संबंधित लोकही आहेत. आणि सगळ्यांत मोठा ग्रूप जिंतूरचे योग शिक्षक काकडे सरांचा आहे. ते मोठे पोलिस अधिकारी आहेत,पण अनेक वर्षांपासून योग शिकवतात आणि त्यांची साधना तर चाळीस वर्षांची आहे. अय्यंगार पद्धतीचा योग ते शिकवतात. त्यांचे अनेक विद्यार्थीही आले आहेत.पाच- सहा महिलासुद्धा आहेत. सर्वांनी आपला परिचय दिला व योगाशी असलेला संबंधही सांगितला. जे लोक योग साधक नाहीत किंवा योग प्रशिक्षण घेतलेले नाहीत,तेही योग साधक आहेत, असंच वाटतंय. कारण चर्चेत त्यांची योगातील आवड, आस्था व जागरूकताही समोर आली. सर्वांनी योगाशी संबंधित अनुभव सांगितले. नंतर थोडं माझ्याविषयी बोललो की, मी कसा अनियमित योग साधकापासून नियमित योग साधक बनत आहे, योग-ध्यान व सायकलिंगच्या संदर्भात मला आलेले अनुभव इ.वर थोडं बोललो. चर्चा छान झाली. आणि ह्या मीटिंगमुळे आणखीही काही योग साधक संपर्कात आले. मीटींग चांगली झाली आणि थकवा असूनही मी त्यात चांगला सहभाग घेऊ शकलो. संध्याकाळीही इथे सायकलवरच आलो, त्यामुळे दिवसभरात सुमारे ५५ किमी सायकलिंग झालं.

तिथून परत आल्यावर नऊ वाजले आहेत. अगदी चार घास खाऊन झोपेला शरण गेलो. परत उद्या पहाटे साडेचारला उठायचं आहे, त्यामुळे आज रात्री सहा- सात तास तरी झोप अनिवार्य आहे. जर चांगली झोप झाली नाही, तर उद्याचा माझा प्रवास अडचणीत येईल. अनेक दिवस रोज सायकलिंग करताना चांगला आराम फार मोलाचा. वर्क आउटसोबत वर्क इन (आराम, मनाने रिलॅक्स असणं आणि चांगली झोप, ध्यान) हेही गरजेचं असतं. तरच मी दुस-या दिवशी परत ताजातवाना राहीन.ह्या अपेक्षेने झोपलो आणि आता मस्त झोपही आली!

 

 

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर(६३ किमी)

 

१२ मे ला पहाटे साडेपाचला जिंतूरवरून निघालो. रात्री चांगली झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत आहे. आज ६२ किलोमीटर सायकल चालवायची आहे. माझ्यामुळे जिंतूरला डॉ. पारवेंना पहाटे लवकर उठावं लागलं व मला निरोप द्यायला ते रस्त्यापर्यंत आले. सकाळच्या प्रसन्न वेळेत सायकल चालवणं खूप मोठं सुख आहे! चांगली झोप झाल्यामुळे कालचा थकवा दूर झाला आहे. काल अगदी थकलेल्या स्थितीत एकदा वाटलं होतं की, हे सगळं जमेल ना? पण तेव्हा मग ठरवलं की, आत्ता पूर्ण प्रवासाचा विचारच करणार नाही. फक्त त्या त्या वेळच्या स्थितीवर लक्ष देईन. म्हणून आत्ता फक्त आजच्या टप्प्याचाच विचार करतोय. विपश्यनेमध्ये ‘इस क्षण की‌ सच्चाई’ म्हणतात तसं.

जिंतूरवरून पुढे जाताना रस्त्याच्या आजूबाजूला टेकड्या दिसतात. रस्ताही उतार- चढावाचा आहे. ही सिंगल गेअरची सायकल असल्यामुळे चढाव जाणवत आहेत.टायर्स अजून पूर्ण रुळले नाहीत, त्यामुळे उतारावरही जास्त वेग मिळत नाहीय. रस्त्यावर काही गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे बोर्ड दिसले. काल मंठाच्या साधकांसोबत बोललो होतो. आज माझ्या रस्त्यावर मंठा लागेल.मंठातून जाताना भेट असं म्हणाले आहेत.

काल ऊन्हाचा जो त्रास झाला होता, त्यातून बोध घेऊन आज माझ्या दोन्ही बॉटल्समध्ये इलेक्ट्रॉल पूर्ण टाकून घेतलं आहे. जवळ जवळ दर १० किलोमीटर अंतराने चिक्की किंवा बिस्कीट खातोय. काल खूप गॅपनंतर पहिला ब्रेक घेतला होता. त्यामुळे आज पहिला ब्रेक एकोणीस किलोमीटरवर चारठाणा फाट्याला घेतला.चहा- बिस्कीट घेतलं, तिथे संस्थेची पत्रकं दिली, ह्या प्रवासाविषयी सांगितलं व पुढे निघालो. इथे आधीही सायकल चालवली आहे, त्यामुळे रस्ता ओळखीचाच आहे. घराच्या बाहेर आलोय, पण अजून अंगणच सुरू आहे! आज उलट्या दिशेने वाहणा-या वा-यामुळे अर्थात् हेड विंडमुळे माझा वेग थोडा कमी आहे. तरीही मजा येते आहे. इतक्या प्रसन्न वातावरणात सायकल चालवतोय की, आपोआप मनात अनेक गाणी वाजायला सुरू होतात. त्यामुळे आरामात सायकल चालत राहिली व मी मनातल्या मनात गाणे ऐकत पुढे जात राहिलो.

एका ठिकाणी रस्त्यावर दूरवर कुत्रे जोरात पळताना दिसले. अगदी पिवळ्या रंगाचे व चेंडूप्रमाणे टप्पे खात पळणारे! नीट बघितल्यावर कळालं की हरीण आहेत! नंतर एका जागी माकडंही दिसले. त्यामुळे मी एकटा जरी जात असलो तरी एकटा नाहीय. मंठाच्या जवळ आल्यावर तिथल्या योग साधकांना फोन केला. खरं तर ते संस्थेशी प्रत्यक्ष जोडलेले नाहीत, पण ह्या प्रवासाच्या मार्गावर शेवटी मंठ्याला एक हॉल्ट असेल. त्यामुळे मंठाच्या लोकांना संपर्क केला. तेव्हा ह्यांच्याशी संपर्क झाला. आदित्य सेवा संघ नावाची एक संस्था आहे. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात परत जाताना मंठ्याला येईन तेव्हा सविस्तर बोलणं होईल. आत्ता जास्त वेळ नाहीय, कारण ऊन वाढायच्या आत मला परतूरला पोहचायचं आहे. तरीही त्यांना थोडा वेळ भेटलो,त्यांच्यासोबत नाश्ता केला व निघालो. आता दोन- अडीच तास सायकलिंग केल्यामुळे थोडा थकवा वाटत आहे.त्यांच्यापैकी एक जण इथून परतूरला जाणार आहेत, त्यामुळे माझा लॅपटॉप व सामानही त्यांच्यासोबत पाठवता आलं. त्यामुळे जाताना थोडं सोपं जाईल व रस्त्यावरच्या खड्ड्यांची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. नाही तर लॅपटॉपला काही होईल का, ही शंका मनात येते.

आता जालना जिल्हा सुरू झाला आहे. इथे मी पूर्वी जेव्हा सायकल चालवली होती, तेव्हा प्रत्येक वेळी जालना मला जणू विचारत होता- जाल ना? जाशील ना? ह्या वेळी योग साधकांना भेटण्याच्या इच्छेमुळे पुढे जात राहिलो. आज कोण कोण भेटतील, त्यांचं काम कसं असेल, मीटिंग कशी असेल, हाही विचार मनात सुरू आहे. पण हळु हळु ऊन्हाचा त्रास सुरू झाला. एक तर मंठ्यात बराच वेळ थांबल्यामुळे शरीराची लय थोडी बिघडली होती. आता जास्त अंतर राहिलं नाही आहे,पण जास्त ऊर्जासुद्धा राहिली नाही आहे! परतूर १४ किलोमीटरवर असताना ऊन्हाचा तडाखा सुरू झाला.जेव्हा मेडीकल दिसलं, तेव्हा दोन लिक्विड एनर्जाल लगेचच पिऊन टाकले. थोडं बरं वाटलं. पण पुढे रस्ता पूर्ण उखडलेला होता! त्यामुळे अंतर कमी असलं तरी वेळ जास्त लागला व त्रास चालू राहिला. अशावेळी अगदी थकलो असताना एका ट्रॅक्टरवर ओळखीचं गाणं ऐकून खूप बरं वाटलं! आपोआप ते मनातल्या मनात सुरू झालं. ऊन्हाच्या होत असलेल्या त्रासावर असलेलं लक्ष तिथून दूर झालं व मनातल्या मनात ते गाणं ऐकण्यावर गेलं व त्या प्रमाणात चालवणं सोपं झालं.

जवळजवळ अकरा वाजता परतूरच्या साईबाबा मंदीराजवळ पोहचलो. इथे काही योग साधकांनी मला रिसीव्ह केलं व मुक्कामाच्या जागेपर्यंत घेऊन गेले. डॉ.दिरंगे सरांनी सायकल चालवत रस्ता दाखवला. डॉ.आंबेकर सरांच्या घरी पोहचल्यानंतर पुन: एकदा स्वागत झालं; थोडा वेळ बसलो; थोडं बोलणं झालं. कालच्या इतकं नाही, पण तरीही बरंच थकलोय. क्रिकेटच्या भाषेत काल आठ विकेट पडल्या होत्या, आज सात पडल्या आहेत. पण एकदा घरी पोहचल्यावर हळु हळु निवांत झालो. लवकरच फ्रेश होऊन आराम सुरू केला. आज सुमारे ६३ किलोमीटर सायकल चालवली. विरुद्ध दिशेचा वारा- हेड विंड असल्यामुळे वेग थोडा कमी होता. दुपारी जेवणानंतर आणखी विश्रांती घेतली, थोडी झोपही लागली व नंतर लॅपटॉपवरही अडीच तास काम करू शकलो. अर्जंट सबमिशन्स पूर्ण केले. कालच्या तुलनेत लवकर रिकवरी होते आहे. शरीरालाही थोडी सवय होते आहे. नक्कीच, पुढच्या दिवसांमध्ये हा प्रवास आणखी सोपा होत जाईल.

आता संध्याकाळच्या मीटिंगची वाट बघतोय. सकाळी पोहचल्यावरच बघितलं होतं की, परतूरमध्ये योग साधिकांची ‘नारी शक्ती टीम’ खूप सक्रिय आहे.संध्याकाळच्या मीटिंगमध्ये त्याची प्रचिती आली. सुमारे पंचवीस- तीस योग शिक्षक- साधिका मीटिंगला आले.पहिली गोष्ट ही आवडली की, माझा परिचय अनौपचारिक प्रकारे करून देण्यात आला. मीटिंगसुद्धा मीटिंग नसून एक अनौपचारिक चर्चा अशीच झाली.सर्वांनी आपापला परिचय दिला व योगाशी असलेला संबंध सांगितला. इथे जालनाच्या चैतन्य योग केंद्राचे सुमारे आठ सक्रिय योग साधक आहेत. त्यांनी एक तर योग शिक्षण पदविका पूर्ण केली आहे किंवा करत आहेत. आणि जे योग- विद्यार्थी नाहीत, तेही योगाबद्दल अनेक गोष्टी जाणत आहेत. जेव्हा चर्चा करणा-या लोकांमध्ये इतकी जागरूकता असेल, तेव्हा चर्चापण चांगलीच होणार. इथे महिलांची टिम खूप सक्रिय आहे.योग आणि योग साधना, योग शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. इथल्या टीमची क्षमता बघून खात्री वाटतेय की, लवकरच परतूरला ह्या कोर्सचं वेगळं सेंटर सुरू होईल, त्यांना ह्या कोर्ससाठी जालन्याला जाण्याची गरज राहणार नाही. सर्वांनी योगाशी संबंधित अनुभव सांगितले. योग करण्यामध्ये असलेल्या अडचणीही सांगितल्या. अशा अडचणी अनेक प्रकारच्या असू शकतात. जसे महिलांना सकाळी घरातलं काम सोडून योग वर्गावर येणं सोपं नसतं. पण समस्या असेल तिथे त्यावर उपायही असतो. आणि कोणत्याही दिशेने पुढे जायचं‌ असेल तर सोबत हवी आणि ही टीम निश्चितच त्यासाठी सज्ज आहे. ह्या टीमला भेटून नवीन ऊर्जा मिळाली. कोणतंही सामाजिक काम पुढे न्यायचं असेल, तर त्यासाठी कार्यकर्त्यांची टीम हवी. संघटन हवं. इथे ते स्पष्ट दिसतं आहे. चर्चेमध्ये ग्रूपच्या पुढच्या नियोजनाविषयी बोलणं झालं. योग- कार्य पुढे नेण्यासंदर्भात बोलणं झालं. ह्या टीमची मुख्य साधिका व कार्यकर्ती अदिती योग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे.

चर्चेच्या शेवटी माझे योग- ध्यान व सायकलिंगशी संबंधित अनुभव सांगितले. चर्चेत सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे माझ्यासाठी बोलणं सोपं झालं. चर्चा संपताना पाऊस सुरू झाला व त्यामुळे वातावरण आणखी प्रफुल्लित झालं. ह्या सर्व योग साधकांना भेटून आनंद होतो आहे. आणि त्यांनाही मला भेटून आनंद झाला आहे! थोडा वेळ व्यक्तिगत भेटी झाल्या व लवकरच चार घास खाऊन रात्रीच्या झोपेसाठी तयार झालो. शक्य तितक्या लवकर झोपलो व हेच रोज करेन, त्यामुळे पहाटे उठणं सोयीचं जाईल. आज दुसरा दिवस पूर्ण झाला. अनेक साधक भेटले आणि दोन दिवसांमध्ये सुमारे ११७ किलोमीटर सायकलिंगही पूर्ण झालं.

पुढील भाग: परतूर- अंबड (६३ किमी)

 

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड

 

योग सायकल यात्रेचा तिसरा दिवस, १३ मे ची पहाट.रात्री चांगला आराम झाला आणि काल योग साधकांसोबत झालेल्या चर्चेने चांगली ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे प्रवासाचा उत्साह आणखी वाढला आहे. काल जिथे थांबलो, ते परतूर! ह्याला खरं तर परतूड म्हणातात. आणि महाराष्ट्र व भारताच्या इतिहासामध्येही ह्या गावाशी संबंधित एक गोष्ट आहे. १७६१ मध्ये पानिपतमध्ये मराठे व अब्दाली ह्यांच्यात पानिपतचं तिसरं युद्ध झालं. जेव्हा मराठा सेना ह्या युद्धासाठी निघाली, तेव्हा ती परतूडमध्ये होती. परतूडमध्ये सदाशिवरावभाऊ पेशवेंच्या नेतृत्वाखाली मराठी सेनेने निजामाला हरवलं होतं. परतूडमध्येच मराठी सेनेला अब्दाली व नजीबखान रोहीलाच्या सेनेने मराठा सरदार दत्ताजी शिंदेंना पराजित केल्याची‌ बातमी मिळाली होती व म्हणून परतूडवरूनच ही मराठी सेना दिल्लीसाठी निघाली होती.

आज परतूरवरून अंबडला जाणार आहे आणि हा टप्पा सुमारे साठ किलोमीटरचा असेल. परतूरवरून अंबडला जाण्याचे दोन मार्ग आहेत. परतूरच्या परिचितांसोबत बोलून त्यापैकी एक रस्ता ठरवला. ज्यांच्याजवळ काल थांबलो होतो, ते डॉ. आंबेकर सर मला सोडवायला स्टेशनपर्यंत सायकल चालवत आले! काल रात्री पाऊस झाल्यामुळे हवा आल्हाददायक आहे आणि आजही ढग आहेत. वा! आज तिसरा दिवस असल्यामुळे शरीरही लयीत आहे. परतूरनंतर काही वेळ रस्ता चांगला होता,पण नंतर अगदी साधा रस्ता सुरू झाला. एका अर्थाने आता इंडिया संपून भारत सुरू झाला. अगदी छोटी गावं आणि शेतं! जवळ जवळ निर्जन रस्ता! पण सकाळचं प्रसन्न वातावरण व शांतता! ऊन्हाचं‌ तर चिन्हही नाही!सगळीकडे मस्त शेती‌ व नैसर्गिक सौंदर्य! थोड्या अंतरावर डोंगरही आहेत. त्यामुळे साधाच रस्ता असूनही आरामात पुढे जात राहिलो. एक- दोनदा रस्ता विचारून पुढे निघालो. रस्त्यावर अनेक चढ- उतार लागत आहेत.सुमारे दोन तासांनी घनसावंगी ह्या तालुक्याच्या ठिकाणी पोहचलो. इथे थोडा नाश्ता केला- तोच चहा- बिस्कीट.हॉटेलवाल्याने माझ्या सायकलवर लावलेला छोटा बोर्ड बघितला व म्हंटलं की, तुम्ही सेवा करताय, तुमच्याकडून कमी पैसे घेईन! मला हा माणूसही अप्रत्यक्ष प्रकारचा योग साधक किंवा योगार्थी वाटतोय! नंतर त्यांना माझ्या प्रवासाबद्दल माहिती दिली, संस्थेची पत्रकं दिली व पुढे निघालो.

आता हायवे तर सुरू झालाय, पण काही ठिकाणीह्याचीही स्थिती फार ठीक नाहीय. पण आज ऊनचपडलं नाहीय, त्यामुळे मजेत जाऊ शकतोय. आजवरइतकी सायकल चालवली आहे की आता समोर एखादानाला किंवा पूल दिसला की लगेच कळतं की, आताइथून चढ सुरू होणार. किंवा जर पाण्याची टाकी किंवाटॉवर दिसलं तर कळतं की, पुढे उतार असणार. रस्त्यावर एका ठिकाणी फाटा लागला- तीर्थपूरी १३किमी. त्या भागात दहीगव्हाण गावात पहिलेही गेलोआहे. त्या गावामध्ये चांगलं विकास काम सुरू आहे. तसंच बायोगॅस, जल संवर्धन अशा विषयांवरही कामसुरू आहे.

हळु हळु अंबड जवळ येतंय. पण चढ असल्यामुळे व वारा उलट दिशेला वाहत असल्यामुळे वेग कमीच आहे.मध्ये मध्ये रस्त्यावरचे लोक वळून बघतात; कोणी तर थांबून माझ्याशी बोलतात. वेग कमी असला तरी नजारे सुंदर आहेत व त्यामुळे सायकलिंगचा पुरेपूर आनंद घेता येतोय. जेव्हा असे नजारे बघतो, तेव्हा मनामध्ये आपोआप गाणं सुरू होतं- ‘आओ हुजूर तुमको, सितारों में ले चलूँ! दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं!’ गाणं मनातल्या मनात ऐकत पुढे जात राहिलो. सायकलचं कौतुक करावं तितकं कमी. कारण अगदी साध्या किंवा साधारणपेक्षाही कमी दर्जाच्या रस्त्यावर सायकलीने उत्तम सोबत दिली. नंतरही चढ असल्यामुळे थोडा वेळ लागला, पण अपेक्षित अशा वेळेतच अंबडला पोहचलो.६० किमी झाले. मला रिसीव्ह करायला डॉ. जाधव सर सायकलीवरच आले. त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो.तिथे आणखी काही योग साधकांनी स्वागत केलं. त्यात अंबडचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग साधकही‌आहेत.त्यात एक फिरोज़ पठान आहेत. त्यांनी त्यांच्या कामाविषयी माहिती दिली, माझ्या प्रवासाविषयी विचारलं आणि आज श्री श्री गुरूजींचा वाढदिवस असल्याने त्यांच्या गावात एक कार्यक्रम आहे, त्यालाही मला बोलावलं.

आज ऊन अजिबात नसल्यामुळे जास्त थकलोच नाही.आता ह्या रूटीनची सवय झाली आहे. दुपारी थोडा आराम करून संध्याकाळच्या बैठकीसाठी तयार झालो.डॉ. जाधव सरांनी सांगितलं की, अंबडमध्ये जालन्याच्या चैतन्य योग केंद्राची जी शाखा चालते, त्यातले अनेक योग साधक काही कारणामुळे बाहेर गेले आहेत किंवा प्रवासात आहेत. हे दिवसही लग्नाचे दिवस आहेत.त्यामुळे अगदी थोडेच साधक अंबडमध्ये आहेत. संध्याकाळी मीटिंगच्या ऐवजी त्या योग साधकांसोबत व्यक्तिगत प्रकारे भेटणं झालं. अंबड शहरातला डॉ.जाधव सरांचा जन संपर्क बघता आला. योगाशी संबंधित काही‌ साधकांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर सुरू असलेल्या कामाची माहिती मिळाली. त्या दरम्यान डॉ. जाधव सरांनी अंबडमधल्या एकूण योग- कार्याची माहिती दिली. हे खरं तर जालन्याच्या चैतन्य योग केंद्राचाच एक भाग आहे. पण इथे अभ्यासक्रम नव्याने सुरू झाला आहे. त्यामुळे शिकवण्यासाठी जालन्यामधलेच तज्ज्ञ येतात. इथे टीम आता उभी राहात आहे. संध्याकाळी अंबडच्या मंदीरात गेलो. रात्री ह्या टीममधले एक योग साधक- श्री. मेटकर मोठा प्रवास करून आल्यावरही मला भेटायला आले.त्यांच्या कामाची माहिती मिळाली. हे सर्व बघून असं वाटतंय की, इथे टीम आत्ता उभी राहात आहे. कार्यकर्ते सक्रिय होत आहेत. संध्याकाळचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम रात्री उशीरा सुरू होणार असल्याचं कळालं,त्यामुळे तिथे जाता आलं नाही.

अंबडमध्ये तशी बैठकीसारखी चर्चा झाली नाही तरी काही कार्यकर्त्यांसोबत भेट झाली. तालुका असला तरी अंबड छोटं गाव आहे. अशा ठिकाणी योगासारख्या विषयावर काम करणं सोपं नाही. तरीही इथे नियमित योग- वर्ग होतात. लोक योग करतात. ह्या परिसरात आर्ट ऑफ लिव्हिंगचंही चांगलं काम सुरू आहे. उद्या ह्या प्रवासातला एक मुख्य टप्पा असेल. उद्या रोहीलागडमार्गे औरंगाबादला जाईन.

पुढील भाग: अंबड- औरंगाबाद

 

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड -औरंगाबाद

 

योग- सायकल यात्रेचा चौथा दिवस, १४ मेची पहाट.आज अंबडवरून औरंगाबादला जायचं आहे. पहाटे अंबडमधल्या काही योग साधकांना भेटून निघालो. इथे ते व्यक्तिगत वर्ग घेतात. आजचा अर्धा रस्ता ‘भारतातून’असेल आणि हायवेपासून ‘इंडिया’ सुरू होईल! आज पहिल्यांदा स्वत:ला ह्या सायकल मोहीमेवर आल्याबद्दल धन्यवाद दिले! कारण जर गाडीने आलो असतो तर ह्या भागात कधीच आलो नसतो! आजच्या रस्त्यावर रोहीलागड आहे. हे आज एक छोटं गाव आहे, पण पूर्वी इथे बौद्ध लेण्या होत्या. रोहीलागडाजवळच जांबुवंतगड आहे ज्याचा संबंध श्रीकृष्णाच्या वेळच्या जांबुवंताशी आहे, असं मानलं जातं. आज आधी रोहीलागड बघण्याची उत्सुकता आहे. इंटरनेटवर त्याबद्दल शोधलं होतं, पण काही विशेष सापडलं नाही. अंबडवरून निघाल्यानंतरच रस्ता एकदम सुनसान भागातून जातोय.कालच्या सारखीच रमणीय शांतता व निसर्गाची सोबत आणि मध्ये मध्ये लागणारी अगदी छोटी गावं!

जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ जातो, तेव्हा निसर्गातील ऊर्जा आपल्याला ताजतवानं करते. रोहीलागडावर ज्या बौद्ध लेण्या आहेत, त्यासुद्धा ध्यानाचं केंद्र असणार. त्या लेण्या ह्या परिसरात का होत्या, हे आजसुद्धा इथला निसर्ग बघताना कळतं आहे. इतक्या उन्हाळ्याच्या दिवसांतसुद्धा इथे नैसर्गिक सौंदर्य जाणवतं आहे. ज्या वेळी ह्या लेण्या बनवल्या असतील, तेव्हा तर इथला निसर्ग आणखीन सुंदर असणार आणि ध्यानासाठी अधिक मदत करत असणार. त्यामुळेच ध्यानाची व साधनेची अशी क्षेत्रं दुर्गम डोंगरांवरच जास्त असतात. प्राचीन काळी तिथे जाणंही कठीण असायचं. हासुद्धा साधनेचाच एक भाग आहे. अशा जागी पोहचताना जो त्रास होतो; जो विराट निसर्ग दिसतो; त्यामुळेही साधनेला बळ मिळतं. तसंच अशा जागी पोहचताना आपले नेहमीचे विचार व विषय मागे पडतात आणि एक रिक्तता मनात येते. पण आता अशा जागी पोहचणंही सोपं झालंय, त्यामुळे ह्या प्राचीन हेतुला बाधा येत असणार.असो.

रोहीलागड आता तर उद्ध्वस्त स्वरूपात आहे. पण एकमोठा दगड रस्त्यावर आलेला आहे व तो लेण्यांचा भागहोता, असं म्हणतात. लेण्याही आता नीट राहिलेल्यानाहीत. काही क्षण थांबून पुढे निघालो. मनात विचारयेतोय की, प्राचीन काळी प्रवासी येत असतील तर कसे? साधनं व माहिती तर फार कमी होती. पण मला वाटतंकी, प्रत्येक काळाची वेगळी आव्हानं व अनुकूल बाबीअसतात. जसं प्राचीन काळी किंवा आत्तापासून अगदीतीस- चाळीस वर्षांपूर्वीसुद्धा अनेक गोष्टी अनुकूल अशाहोत्या. जर एखाद्या प्रवाशाला तीर्थयात्रेला जायचं असेल, तर त्याला पैशांची काहीच काळजी करायची गरजनव्हती. पूर्वी साधनं कमी असली तरी लोकांमध्ये अधिकघट्ट संबंध होते. त्यामुळे रस्त्यातली व्यवस्था कशीहोणार, ही इतकी काळजी नसायची. त्यामुळे प्रवासीदेशभर सहज फिरायचे. कारण प्रत्येक ठिकाणी व्यवस्थाकरणारे लोक होते. आज साधनं, तंत्रज्ञान आणिमाहितीचा प्रचंड विस्तार झालेला असला तरी लोकांमध्येतितके घट्ट संबंध राहिलेले नाहीत व एका अर्थाने सर्वचगोष्टींचं आर्थिकीकरण झालं आहे. त्यामुळे मला वाटतंकी, आजसुद्धा अनुकूल बाबी आहेत आणि आव्हानंहीआहेत. तीच गोष्ट शरीराच्या क्षमतेचीही आहे. आज बुद्धीअधिक सुगम झालेली असली तरी शारीरिक क्षमतेचास्तर खाली आला आहे. असो.

रोहीलागडच्या पुढे सहा किलोमीटरवर औरंगाबादला जाणारा महामार्ग मिळाला. इथे एकदा नाश्ता केला,लोकांना पत्रकं दिले. इथून पुढे आता मस्त रस्ता असेल.दोन दिवस ‘भारतात’ सायकल चालवल्यानंतर आता हायवेची मजा मिळणार. इथून औरंगाबाद सुमारे पस्तीस किलोमीटर असेल. आता ऊन वाढतंय आणि आज ढगसुद्धा नाही आहेत. पण आज चौथा दिवस असल्यामुळे शरीराला पूर्ण सवय झाली आहे. जसं आपण झाडाचं एखादं पान तोडलं किंवा फांदी तोडली तर झाड जणू म्हणतं की, हरकत नाही, मी अनेक पानं व अनेक फांद्या निर्माण करेन! तसं आता माझं शरीरही म्हणतंय की, इतक्या ऊन्हात सायकल चालवायची आहे,हरकत नाही! शरीर त्यासाठी तयार राहील आणि ऊर्जा भरून काढेल. त्यामुळे काही त्रास न होता पुढे जातोय.थोड्याच दिवसांपूर्वी औरंगाबादमधली स्थिती तणावपूर्ण झाली होती. पण आता जाऊ शकतो आहे. ह्या पूर्ण प्रवासात एक गोष्ट अगदी वेगळी अनुभवतोय की, मी जिथे जाईन, तिथे मला भेटायला लोक येतील. एकट्याने सायकल चालवणे व एक विषय व एका संस्थेच्या सोबतीने सायकलिंग करणे ह्यातला गुणात्मक फरक स्पष्ट जाणवतोय.

उरलेलं अंतर लवकरच पार झालं. मोठा हायवे असल्यामुळे थोडा वेग मिळाला. पण तरी काही ठिकाणी चढ व हेड विंड असल्यामुळे कमी वेग होता. तरीही अकरा वाजता औरंगाबादमध्ये पोहचलो. इथे फारच भावुक करणारं स्वागत झालं. इथल्या योग साधिकांनी तर माझे चक्क पाय धुतले. मी नाही म्हणालो, तेव्हा मला म्हणाल्या की, शरीरातली उष्णता कमी व्हावी म्हणून असं करत आहेत. औरंगाबादमध्ये पोहचलो तेव्हा चौथ्या दिवशी २४० किलोमीटर पूर्ण झाले आणि योगायोगाने इथला एसटीडी कोडसुद्धा ०२४० आहे! सतत सायकल चालवल्यामुळे आता सायकलिंग जवळजवळ एफर्टलेस झालं आहे. जसं आपण एखादी गोष्ट सारखी करत गेलो तर आपोआप मनात विचार येतो, ह्यामध्ये काय विशेष आहे बरं. तसंच आता शरीरालाही जाणवतंय की,सायकल चालवतोय, काय विशेष त्यात.

औरंगाबादमध्ये संध्याकाळी योग साधकांना भेटायचं होतं. पण औरंगाबादमध्ये पोहचल्या पोहचल्या क्लाएंटसचे कॉल सुरू झाले आणि पूर्ण दिवस लॅपटॉपवर काम करावं लागलं. पहाटे चारला उठलो होतो आणि ६३ किलोमीटर सायकल चालवली होती, तरी दुपारी एक मिनिटही झोपण्याची संधी मिळाली नाही.आणि डेडलाईनचं प्रेशरही इतकं होतं की, झोपही आली नाही! आणि हे कामही अगदी खडबडीत रस्त्यावरच्या ड्रायव्हिंगसारखं अडचणीचं होतं. त्यामुळे संध्याकाळी योग साधकांना भेटता आलं नाही. पण आजचा दिवस माझ्या योग- यात्रेतला कसोटीचा दिवस नक्कीच होता.चौथा दिवस असल्यामुळे संध्याकाळपर्यंत शरीराचा स्टॅमिना टिकू शकला. पण आता औरंगाबादला पोहचल्यानंतर एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. उद्या देवगिरी किल्ला बघेन आणि योग साधकांना भेटेन.

 

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा

 

योग- सायकल प्रवासाचा पाचवा दिवस, १५ मे ची पहाट. कालचा दिवस फार मोठा गेला. पण रात्री चांगला आराम झाल्यामुळे मस्त वाटतंय. आज छोटीच राईड आहे- फक्त ३७ किलोमीटर. आणि आज पाचवा दिवस असल्यामुळे हे अंतर अगदीच किरकोळ वाटतंय. काल संध्याकाळी योग साधकांना भेटू शकलो नव्हतो. आज त्यांना भेटेन. काल मला ज्यांनी रिसीव्ह केलं होतं त्यात एक सायकलिस्टसुद्धा होते. आज पहिले त्यांच्यासोबत जवळच्याच देवगिरी किल्ल्यावर जाईन. तिथे श्री. खानवेलकर सर आणि अन्य काही योग साधक येतील व थोड्या गप्पा किल्ल्यावर होतील.

पहाटे साडेपाचला निघालो. महेंद्रकर सरही तयार आहेत. ते औरंगाबादमध्ये सायकल चालवतात. त्यांच्यासोबत निघालो. गेले अनेक दिवस एकट्याने सायकल चालवली होती. आज बोलत जाताना छान वाटतंय. आणि औरंगाबादमध्ये हवा थोडी थंड आहे, सोबतीला डोंगर आणि हिरवळही आहे. दौलताबाद अर्थात् देवगिरी किल्ला! भूतकाळाच्या दरीतून वर वर्तमानात डोकावणारं जणू एक शिखर! न जाणे किती काळापासून ह्या किल्ल्याने किती लोक बघितले असतील! भारतीय इतिहासाचं एक विलक्षण प्रतिक! ह्या किल्ल्याबद्दल एक गोष्ट अशी की, जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीची सेना इथे हल्ला करण्यासाठी आली, तेव्हा काही दिवस तर ते देवगिरीच्या जवळ असलेल्या शरणापूर टेकडीलाच देवगिरी समजत होते! काही दिवस ते इथेच लढत राहिले व मग त्यांना कळालं की, किल्ला तर पुढे आहे! देवगिरीच्या आधी शरणापूरचा तो डोंगर दिसला. एक क्षण तर मलाही तो देवगिरीच वाटला!

लवकरच देवगिरी किल्ल्याजवळ पोहचलो. शहरापासून फक्त १५- १६ किलोमीटर दूर आहे. रस्ता चढ- उताराचा आहे. एक गमतीची गोष्ट अशी आहे की, जेव्हा चढ येतोय, तेव्हा माझी सायकल हळु चढते आणि सरांची सायकल पुढे जाते आणि जेव्हा सपाट रस्ता येतो, तेव्हा दोन्ही सायकली सोबतच असतात. किल्याजवळ थोडा वेळ थांबलो. लवकरच बाकीचे साधकही आले. ह्या सगळ्या कामासंदर्भात थोडं बोलणं झालं. योगातील विविध परंपरा- पद्धती ह्याविषयी बोलणं झालं. अनेक आसन आणि प्राणायाम वेगवेगळ्या प्रकारे केले जातात; लोक त्यांना वेगवेगळ्या नावांनीही ओळखतात. त्या अर्थाने आज योगामध्ये एक प्रकारची पारिभाषिक जटिलता वाढताना दिसतेय. आज अनेक प्रकारच्या योग- पद्धती सहज उपलब्ध आहेत. पण अशा वेळेस आपल्याला खूप डोळसपणे बघायला हवं की, आपल्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे आणि आपल्यासाठी काय योग्य राहील. प्रत्येक साधकाने ह्याविषयी सजग राहायला हवं. किल्ल्यावर फिरता फिरता गप्पा होत राहिल्या. किल्ल्यावर मोर आणि माकडं दिसली. अशा प्राचीन वास्तूला बघताना ही वास्तू किती प्राचीन आहे, असा विचार आपण करतो; त्यासंदर्भात विवादही करतो. पण आपल्याला हेसुद्धा बघायला पाहिजे की, आपल्यामध्येही काही तरी तितकंच प्राचीन आहे. आणि अशा ठिकाणी गेल्यावर त्याची थोडी जाणीवही होते. आपल्यामध्ये जे इतकं प्राचीन आहे, ते शोधणं म्हणजेच तर ध्यान आहे!

किल्ल्यावरून परत आल्यानंतर काही वेळाने ह्या सर्व योग कार्याचा पाया ज्यांनी उभा केला ते धुरंधर योग साधक डॉ. प्रशांत पटेल अर्थात् स्वामी प्रशांतानंद सरस्वतींसोबत भेट झाली. १९७० च्या दशकात त्यांनी योग साधना केली आणि नंतर योग प्रसार सुरू केला. त्यांना भेटणं हा अतिशय ऊर्जादायी अनुभव होता. ते योग साधक तर आहेतच, पण अतिशय दुर्मिळ प्रकारचे कार्यकर्तेही आहेत. एखादं काम कसं सुरू करावं, वेगवेगळ्या लोकांना त्यामध्ये कसं जोडावं, किती कठीण परिस्थितीत त्यामध्ये कसं सातत्य ठेवावं लागतं, अशा अनेक गोष्टी त्यांह्याकडून शिकायला मिळाल्या. त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनात योग साधनेची सुरुवात केली आणि नंतर स्वामी सत्यानंदजींकडून दीक्षाही घेतली. आणि साधनेबरोबरच इतरांनाही शिकवणं सुरू केलं. जिथून, ज्या माध्यमातून लोक मिळतील, तिथे ते जाऊन लोकांना हे काम सांगायचे, लोकांना योग- प्रवाहात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचे. एका अर्थाने ते योग- साधकांना जाळ्यात ओढणारे मच्छीमारच होते! आणि जेव्हा माशाला एका प्रवाहातून काढून दुस-या प्रवाहात सोडलं जातं, तेव्हा तो तडफडतोच! त्यामुळे अनेक लोक सोबत यायचेही नाहीत. पण डॉ. पटेल जी नेहमी लोकांना योग शिकवत राहिले. त्यांचे काही किस्से तर खूपच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या एका मित्राला योग शिकवण्यासाठी ते त्याच्या घरी जायचे. आणि तोही असा की, ते घरी आल्यावर त्यांनीच त्याला उठवायचं. मग ते त्याला योग शिकवणार. पण तो मित्र योग काही शिकला नाही! अनेक प्रयत्न करूनही मासा जाळ्यातून निसटला. पण जाळं फेकणं वाया गेलं नाही, कारण ह्या काळात मित्र नाही, पण त्याची बायको योग शिकली! असं त्यांनी तीन- चार दशक काम केलं. जिथून कुठून लोक मिळतील, तिथून त्यांना जोडलं. लोकांच्या भाषेत त्यांना योग सांगितला. योग प्रसारासाठी रमज़ानमध्ये रोजे ठेवले, चर्चमध्येही गेले; तिथेही सरमॉन घेतलं! अशा धुरंधर गुरूंनी ज्या कामाचा पाया बांधला, तेच काम नंतर परभणी शहरात व पुढे जालना- औरंगाबादमध्ये वाढत गेलं!

संध्याकाळी अशीच चर्चा औरंगाबादच्या विवेकानंद योग केंद्राच्या साधकांसोबत झाली. शहरातल्या योग साधकांच्या टीमसोबत भेट झाली. प्रत्येकाचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत. कोणत्या ना कारणामुळे लोक योगाशी जोडले जातात. हळु हळु योग प्रसार सुरू होतो. आणि आपल्या व्यस्त जीवनातही ते हे काम सुरू ठेवतात. औरंगाबादच्या विवेकानंद योग केंद्राचे साधक जालन्यातल्या सेंटरमध्ये कोर्स करून योग शिक्षक बनले. त्यांच्यातील काही साधक इतरही सेंटरमध्ये शिकून आले आहेत. इथल्या टीममध्ये महिलांचा सहभाग चांगला होता. इथे काही वर्षांपासून योग शिक्षक पदविका कोर्स चालवला जातो. जूनमध्ये कोर्स सुरू होतो, आत्ता त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. चर्चेत साधकांनी अनेक अनुभव सांगितले. फक्त योग- आसन नाही तर ध्यानाशी व जीवनशैलीशी संबंधित अनुभवही सांगितले. काही शिक्षिकांनी त्यांचे व त्यांच्या विद्यार्थ्यांचे अनुभव सांगितले. एका योग- शिक्षिकेने योग साधनेच्या बळावर दारुचं व्यसन असलेल्या लोकांसोबत कसं काम करता आलं, तेही सांगितलं. दारूच्या व्यसन असलेल्या लोकांना त्या जेव्हा भेटल्या, तेव्हा काही दिवस ते लोक त्यांना सतत हसत होते. पण त्यांनी ते सर्व सहन केलं. हळु हळु ते लोक मग त्यांचं ऐकायला तयार झाले. कोणत्याही साधनेची क्षमता म्हणजे फक्त काही कृती करणे, इतकीच नसते तर खूप काही सहन करणे हीसुद्धा असते. सगळ्यांचे अनुभव ऐकताना त्यांना सुचवलं की, हे अनुभव लिहून विवेकानंद योग केंद्राच्या वेबसाईट/ ब्लॉग/ फेसबूक पेजवर टाकावेत, ज्यामुळे इतर लोकांनाही ह्याची माहिती होईल व त्यांनाही प्रेरणा मिळेल!

अशा प्रकारे पाचवा दिवस पूर्ण झाला आणि निरामय संस्था व जालना- औरंगाबादमध्ये जे काम पुढे झालं, त्यातले एक दिग्गज योग गुरू डॉ. पटेल सरांना भेटून खूप काही शिकायला मिळालं. एका अर्थाने हा ह्या सायकल यात्रेचा परमोच्च बिंदू आहे. इथून आता एका अर्थाने परतीचा प्रवास सुरू होईल. उद्या जालनाला जाईन व त्यानंतर आणखी काही ठिकाणी जाऊन परत जाईन. पण काय पाच दिवस गेले आहेत हे! सायकल तर चालवलीच, पण त्याशिवाय खूप नवीन लोकांसोबत जोडला गेलो; खूप लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं मिळतंय. नवीन लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत आणि माझ्या निमित्ताने त्या त्या गावातल्या टीमसोबत जोडले जात आहेत! आणि हाच योगाचा अर्थही आहे- जोडणे!