सायकलिस्टचा परिचय त्याच्याच शब्दांत

नमस्कार. कोणत्याही औपचारिक परिचयामध्ये न अडकता माझा थोडा परिचय करून देतो. शिक्षणाने MSW, व्यवसायाने अनुवादक, मनाने भटक्या लेखक आणि शरीराने हौशी सायकलपटू. योगाच्या संदर्भात सांगायचं तर २००८ मध्ये नाशिक येथे योगम् शरणम् येथे श्री श्रीमूर्ति सरांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षक पदविका कोर्स केला. नंतर अगदी सुरुवातीला राजस्थानात काही दिवस रूढ अर्थाने योग शिक्षण केलं; परंतु त्यानंतर योग शिक्षण केलं नाही. आणि योग साधनेच्या बाबतीत अतिशय आळशी विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश. लहानपणापासून वर्षानुवर्षे योगाचं वातावरण घरात असूनही कधी फार योग करावासा वाटला नाही. पण तरुण वयात सुदैवाने योगाची आवड लागली व consistently inconsistent किंवा regularly irregular पद्धतीने योगाभ्यास सुरू करून हळु हळु सातत्याच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यातच विपश्यना; नंतर गुरूकृपेने अनेक प्रकारे मिळालेलं मार्गदर्शन ह्यामुळे ध्यानाची आवड. आणि प्रवास वर्णन, नैसर्गिक आपत्तीत मदत कार्य, अन्य सामाजिक विषय, विविध जणांसोबतचा संवाद अशा सर्व लेखनामध्ये समान असा ध्यानाचा सूक्ष्म धागा. ध्यानाचे मला जाणवलेले विविध पैलू लेखनातून मांडण्याचा प्रयत्न. आजवर जीवनाकडून जे जे मिळालं ते मांडण्याचा लेखनातून प्रयत्न. अधिक परिचय माझ्या लेखनातून होऊ शकेल-

http://niranjan-vichar.blogspot.in/2015/06/blog-post_17.html – लदाख़मधल्या सायकलिंगचे अनुभव

http://niranjan-vichar.blogspot.in/2016/03/blog-post_28.html – एप्रिल २०१५ मध्ये भर ऊन्हात परभणी- जालना केलेलं सायकलिंग

http://niranjan-vichar.blogspot.in/2017/12/blog-post_29.html – योग ध्यानासाठी सातारा, महाबळेश्वर, अजिंक्यतारा, सज्जनगड अशा भागात (योग- ध्यान किंवा भक्ती- शक्ती अशी थीम) केलेलं सुमारे ३५० किमी सायकलिंग. त्यातला एक अनुभव- . . निर्जन रस्त्यांवर सायकल चालवल्यानंतर गर्दीत सायकल चालवताना वेगळंच वाटतंय. शहराच्या गर्दीत वाहन चालवताना नेहमीच थोडा त्रास होतो. दर वेळी लगेच आपलं मन म्हणतं आंधळा आहे का हा, दिसत नाही का? आपल्याला नेहमी‌ वाटतं की, काही लोक समोर न बघताच गाडी चालवत असतात. पण अशा वेळेस हेही बघायला पाहिजे की, आपलंही‌ लक्ष कुठे आपल्या चालवण्याकडे आहे! आपलंही लक्ष भरकटलं आहे आणि समोरचा माणूस काय करतोय, इकडे आपलं लक्ष आहे. जर आपण थोडे जागरूक झालो व लक्ष स्वत:कडे ठेवलं; आपल्या चालवण्याकडे दिलं; तर कितीही गर्दी असो, आपल्याला ती अस्वस्थ नाही करू शकत. ह्यावरून एक गोष्ट आठवते.

एकदा गौतम बुद्ध प्रवचन करत होते. त्यांच्या सोबत आनंद होते आणि तीन जण प्रवचन ऐकत होते. त्यांचं लक्ष बुद्धांकडे नव्हतं. म्हणून बुद्ध परत परत सांगत होते. हे बघून आनंदला राहावलं नाही आणि त्याने बुद्धांना म्हंटलं, भंते, ह्या लोकांचं आपल्याकडे लक्षच नाहीय. तरीही आपण का बोलत आहात? त्यावर बुद्धांनी म्हंटलं की, त्यांचं लक्ष नाहीय, म्हणून तर त्यांच्याशी परत परत बोलतोय. पण तुला काय झालं की तूही त्यांच्याकडेच लक्ष देतोय. ते ऐकत असतील किंवा नसतील, तुला काय त्याचं? आणि तूसुद्धा तर त्यांच्याकडेच लक्ष देत होतास, तू तरी कुठे ऐकत होतास?

ह्यामुळे नेहमी एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा गर्दीत असताना मनात विचार येतो की, किती आंधळ्यासारखं‌ कोणी चालवतंय, तेव्हा लगेचच स्वत:ला समजावयाचं की, आपणही आंधळेच तर आहोत, त्यामुळेच तर आपलं लक्ष त्यांच्याकडे गेलंय! जर आपलं लक्ष आपल्या चालवण्यावर असतं तर त्यांचं मध्ये येणंही कळालं नसत! असो.